भुसावळात विजयादशमीला बाजारपेठ फुलली
भुसावळात वाहन बाजाराचा टॉप गियर : इलेक्ट्रॉनिक्स, कपडा मार्केटमध्येही चैतन्याचे वातावरण : सोशल डिस्टन्स गरजेचा
भुसावळ : मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे झालेले लॉकडाऊन व त्यानंतरची आतापर्यंतची मार्केटची स्थिती अत्यंत विदारक अशीच राहिली मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या व विजयादशमीचा आलेल्या मुहूर्तामुळे बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दसर्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठ गजबजली होती तर रविवारी शहरातील मार्केटमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी झाली होती. मुहूर्तावर गाडी खरेदीचा भर असल्याने दुचाकी व चारचाकी वाहन बाजारानेही टॉप गियर टाकल्याचे चित्र होते तर झेंडूच्या फुलांना अधिक मागणी राहिल्याने शनिवारी 80 ते 100 रुपये किलोंप्रमाणे होणारी विक्री दुसर्या दिवशी रविवारी अगदी दुप्पट रकमेने होताना दिसून आली. सणाला गोड-धोड पदार्थांना मागणी असल्याने स्वीट मार्टही सजले तर इलेट्रॉनिक्स व कपडा बाजारातही ग्राहकांची वर्दळ वाढलेली दिसून आली.
छोट्या व्यावसायीकांना ही दिलासा
गुढी पाडवा, ईद, देवी-गणपती उत्सवातही बाजारपेठेत मंदिचे वातावरण असल्याने व्यापारी संकटात होते मात्र विजयादशमीच्या मुहूर्तावर छोट्या व मोठ्या व्यापार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवात सीताफळे, सफरचंद आदी फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी राहिली तर लोटगाड्यांवर कपडे विक्रीच्या माध्यमातून विक्रेत्यांनी त्यांच्या हातगाड्या लावल्या आहे. सुवर्णबाजारालाही दसर्या झळाळी मिळणार असून विविध दागिने खरेदीला महिलावर्गाची पसंती राहिली आहे शिवाय रविवार असलेल्या सुटीमुळे अधिक गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भुसावळात झेंडू वधारला
दसर्यानिमित्त झेंडूच्या फुलांना असलेली मागणी पाहता 80 ते 100 रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री शनिवारी झाली तर रविवारी अगदी दुप्पट दराने त्याची विक्री होताना चित्र होते. नगर, घाट, औरंगाबाद, जळगाव आणि नाडगाव येथून झेंडू फुले विक्रेते शहरात दाखल झाले. यंदा झेंडूच्या फुलांचे उत्पादन कमी झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात फुले बाजारात आली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना मोठी मागणी
उत्सवाच्या दिवशी नवीन वस्तू खरेदीची परपंरा असल्याने इलेक्ट्रॉनिक्स मार्केटही ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. रेल्वे कर्मचार्यांन मिळालेला बोनस पाहता टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइॅल, लॅपटॉप आदी चैनीच्या वस्तू खरेदीवर ग्राहकांनी भर दिला आहे. यंदा कोरोनामुळे नागरीकांकडे पैसा नसला आकर्षक हप्त्यांवर वस्तू मिळत असल्याने ग्राहकांचा वस्तू खरेदीवर भर दिला जात ओ.
कोरोनामुळे यंदा शाळा, कॉलेज, कंपन्यांचीकामे ऑनलाईन झाल्याने बाजारात टॅब, मोबाइॅल, लॅपटॉप यांनादेखील मोठा डिमांड आहे.
भुसावळात वाहन बाजाराचा टॉप गियर
विजया दशमीचा मुहूर्त पाहून अनेकांनी यापूर्वीच दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे बुकींग केले आहे व या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये शनिवारी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुध डेअरी, गोड-पदार्थ विक्री होणार्या स्वीट मार्टमध्येही सजावट करण्यात आली असून या माध्यमातूनही मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून आले.

