रावेरच्या वाढीव वसाहतीत निवडणूक
रावेर पालिकेच्या नवीन हद्दवाढ झालेल्या चार जागांसाठी आरक्षण निश्चित : जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता
रावेर : रावेर नगरपालिकेच्या वाढीव वसाहतीसाठी निवडणूक घेण्यात येणार असून चार जागांसाठी प्रशासनाकडून आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.वाढीव वसाहतीचे 12 हजार 900 मतदार एक वर्षासाठी चार नगरसेवक निवडून पालिकेत पाठविणार आहे. पालिकेची हद्दवाढ होऊन सुमारे वर्ष भरानंतर चार जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून वाढीव भागासाठी नगरसेवक सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतेच वाढीव चार जागांसाठी आरक्षण प्रसिध्द केले असून त्याबाबत आदेश रावेर पालिकेला प्राप्त झाले आहेत.
चार नगरसेवकांसाठी असे आहे आरक्षण
रावेर नगरपालिकेच्या वाढीव भागातील 12 हजार 900 मतदार चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यात एक जागा ए.सी.प्रवर्गासाठी राखीव, दुसरी जागा एस.टी.महिलांसाठी राखीव, तिसरी जागा ओबीसीसाठी राखीव तर चौथी जागा महिलेसाठी राखीव असणार आहे तर दोन प्रभागात ही निवडणूक असणार आहे.
असा असणार आहे निवडणूक कार्यक्रम
5 नोव्हेंबर रोजी प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर होई तर 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता, 25 नोव्हेंबर हरकती व सूचना, 10 डिसेंबर आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी, 21 डिसेंबर अंतीम प्रभाग रचनेला मान्यता, 24 डिसेंबर अधिसूचना प्रसिध्द होईल. यानंतर निवडणूक आयोग चार जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी तारखा जाहीर करतील.
निवडणूकीत मूलभूत सुविधेचा विषय गाजणार
आगामी वाढीव भागासाठी चार जागांसाठी निवडणूक तोंडावर आहे. यासाठी आमचे स्थानिक प्रतिनिधी शालिक महाजन यांनी प्रत्यक्ष मतदार व महिलांशी चर्चा केली असता त्यांनी मूलभूत सुविधा देणारा तसेच सर्वांच्या मदतीला सुखा-दुखःत धावून जाणार्या व्यक्तीला आम्ही मतदान करू, अश्या भावना व्यक्त केल्या.
निधीअभावी कामे नाहीत : मुख्याधिकारी
सध्या निधी अभावी वाढीव भागात विकासकामे झालेली नाहीत, आम्ही पालिकेतर्फे या भागात स्वच्छतेसाठी घंटागाडी, पाणीपुरवठा तसेच पथदिवे यांच्यावर काम करत आहोत. घरकुलांसह सर्व योजनांचा लाभ हद्दवाढ झालेल्या नागरीकांना देत असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले.

