मुक्ताईनगरातील विवाहितेचा डेंग्यूमुळे मृत्यू
मुक्ताईनगर :$ डेंग्यूच्या आजारामुळे शहरातील 36 वर्षीय विवाहितेचा शुक्रवारी मृत्यू झाला. भारती अनिल मिस्त्री (36, गोदावरी नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गोदावरी नगरातील रहिवासी अनिल मिस्त्री (वायरमन) यांच्या पत्नी भारती मिस्त्री यांच्यावर भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असता त्यांची शुक्रवारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परीवार आहे. दरम्यान, शहरात डेंग्यूला अटकाव घालण्यात प्रशासनाने सपशेल अपयश येत असल्याने नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

