भुसावळात अपघातानंतर डंपरवर दगडफेक : चालक अटकेत


बुलढाण्यात दाम्पत्यावर एकाचवेळी झाले अंत्यसंस्कार : भुसावळातील गडकरी नगरातील लग्नघरी पसरली शोककळा

भुसावळ : साडूच्या मुलाच्या लग्नाचे औचित्य साधून बुलढाण्यातील दाम्पत्य भुसावळात आले मात्र डंपरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खडका चौफुलीवर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडल्याने गडकरी नगरातील लग्नघरी शोककळा पसरली. अपघात प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केल्याने चालकाच्या दर्शनी भागाच्या काचा फुटल्या तर डंपर चालकास जमाव मारहाण करण्यापूर्वीच पोलिस कर्मचार्‍याने धाव घेतल्याने अप्रिय घटना टळली. दरम्यान, अपघातात मयत झालेल्या चंद्रकात जगन्नाथ वारके (63) व त्यांची
पत्नी संध्या चंद्रकांत वारके (56, बुलढाणा) यांच्यावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जागीच दाम्पत्याचा मृत्यू
बुलढाण्यातील चंद्रकांत वारके हे सपत्नीक गडकरी नगरातील रहिवासी व नात्याने साडू असलेल्या अनिल धांडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी भुसावळात आले होते. गुरुवारी रात्री त्यांनी देना नगरातील नातेवाईकांकडे मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी हळदीच्या कार्यक्रमासाठी गडकरी नगराकडे दुचाकी (एम.एच.28 ए.एल.6671) ने निघाले असता खडका चौफुलीवर वळण घेत असताना मुरूमाची वाहतूक करणारा डंपर (एम.एच.19 झेड.3192) कट मारल्याने दुचाकीवरून दाम्पत्य रस्त्यावर पडले तर त्याचवेळी डंपरचे चाक दाम्पत्याच्या डोक्यावरून गेल्याने उभयंतांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता खडका चौफुलीवर ही घटना घडली.

पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघातानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस
ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा. पोलिस निरीक्षक गणेश धूमाळ, सहा.
फौजदार तस्लीम पठाण, कृष्णा देशमुख, संजय भदाणे व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. पोलिसांनी मृतदेह उचलून रक्त्ताच्या थारोळ्यावर माती टाकली व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. डंपर चालक महेंद्र कोळी (रा.
भोरटेक, ता.यावल) यास अटक करण्यात आली असून अनिल धांडे
यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुरूमाची चौकशी करणार : पोलिस उपअधीक्षक
अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेण्यात आले असून चालकालाही अटक करण्यात आली आहे. डंपरमध्ये असलेल्या मुरूमाबाबत चौकशी करण्यात येणार असून त्याबाबत परवाना नसल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.

अवैध गौण खनिज वाहतुकीकडे महसूलचे दुर्लक्ष
शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या गौण खनिजाची अहोरात्र वाहतूक होत असताना स्थानिक महसूल प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा उघड आरोप नागरीक करीत आहेत. अवैधरीत्या वाळूसह मुरूमाची वाहतूक होत असताना स्थानिक तलाठी, मंडळाधिकारी व प्रशासन कारवाई का करीत नाही? असा प्रश्‍न उपस्थित करण्यासही वाव आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !