मतदार यादीसाठी छायाचित्र जमा न केल्यास मतदारांची नावे वगळणार
मुक्ताईनगर तहसीलला मतदार नोंदणी व कोरोनाबाबत बैठक
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तहसील कार्यालयात तहसीलदार श्वेता संचेती यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नवीन मतदार नोंदणी व कोरोना आणि डेंगूची साथ रोखण्यासाठी अधिकार्यांसह पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांना संपर्काचे आवाहन
बैठकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत तब्बल चार हजार 510 मतदारांचे फोटो नसल्याने ते प्राप्त करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली शिवाय मतदारांनी आपल्या पक्षाच्या मतदान केंद्र प्रतिनिधी अथवा बीएलओ यांच्याकडे 10 डिसेंबरपर्यंत ते देण्याचे आवाहन करण्यात आले तसेच निवडणूक शाखेत छायाचित्र जमा न केल्यास मतदारांचे फोटो नसलेले व कायम स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश पाटील म्हणाले की, कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने नागरीकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. कुष्ठरोग व क्षयरोग आणि डेंगू रोखण्यासाठी 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत शोध मोहिम पंधरवडा राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश पाटील, विस्तार अधिकारी आर.एल.जैन, काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, आरोग्य सहाय्यक एस.के.सुरवाडे, व्ही.एस.पाटील, पोलिस पाटील मोहन मेढे, शैलेंद्र वानखेडे व आदी कर्मचारी उपस्थित होते.

