चित्रकला स्पर्धेसाठी शिक्षक चक्क विद्यार्थ्यांच्या दारी
सावद्यातील कला शिक्षकाच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत
सावदा : कोरोना प्रादुर्भाव काळात नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2021 या अंतर्गत चित्रकला स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर अपेक्षित होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हल्ली शाळा बंद असल्याने केवळ ऑनलाईन पद्धत्तीने विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे मात्र स्पर्धा आवश्यक असल्याने कला शिक्षक नंदू पाटील यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांना साहित्य पुरवत चित्रकला परीक्षेसाठी प्रोत्साहित केले. कलाध्यापकाच्या या उपक्रमाचे सावदा परीसरात कौतुक होत आहे.
32 विद्यार्थ्यांशी साधला संपर्क
कलाध्यापक नंदू पाटील यांनी प्रत्येक वर्गाचे स्वतंत्र व्हाट्सअॅपचे ग्रुपवर चित्रकला स्पर्धेची प्राथमिक माहिती देउन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच इच्छुकांनी आपल्या पर्सनल क्रमांकावर संपर्काचे आवाहन करून नाव नोंदणी करून घेतली. एकूण 32 विद्यार्थ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिल्यानंतर कलाध्यापक ड्रॉइंग पेपर व इतर साहित्य घेवून विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले व त्यांनी स्पर्धेबाबत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. गेल्या काही महिन्यांपासून घरातच असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या प्रकारामुळे आनंद झाला. चक्क शिक्षकच घरापर्यंत साहित्य देण्यास आले याचा आनंद विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही झाल्ला. कोरोना काळातील हाही एक वेगळा अनुभव विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक अनुभवत आहेत. नंदू पाटील यांच्या या प्रयत्नांचे शाळेचे मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, पर्यवेक्षक जे.व्ही.तायडे यांनी कौतुक केले.

