आरटीओ कॅम्पमध्ये बनावट उमेदवार उभे करीत मिळविले वाहन चालविण्याचे परवाने


भुसावळ शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : वाहन चालकांना पक्के लायसन्स देण्यासाठी शिबिरात खोटा उमेदवार उभा करून व फॉर्मवर दुसर्‍या व्यक्तीचा फोटो चिपकावत शासनाची फसवणूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उप-प्रादेशिक परीवहन विभागातील माटेार वाहन निरीक्षक घनश्याम दिलीप चव्हाण (रा.गणेश कॉलनी) हे 5 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत शिबिर दौर्‍यावर होते. 26 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत मोटार वाहन निरीक्षक संदीप शांताराम पाटील यांच्यासह ते वाहनांचे पक्क्या लायसन्ससाठी अर्जदाराची चाचणी घेत होते. यावेळी राजेश सिंधी उर्फ सुक्का हा त्याठिकाणी आला आणि त्याच्याकडील उमेदवारांचे अर्ज त्याने अधिकार्‍यांकडे दिले. या अर्जातील चेतन पांडुरंग पाटील यांच्या अर्जासह कागदपत्रांची पाहणी केली असता त्याच्या फॉर्मवर संगणीकृत असलेला फोटो नसून त्याठिकाणी दुसरा फोटो चिपकविलेला आढळून आला.

बनावट उमेदवाराने केली स्वाक्षरी
उमेदवार बनावट असल्याची कुणकुण लागलाच अधिकार्‍यांना राजेश सिंधी याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला ओळखपत्र दाखविण्याबाबबत विचारणा केली परंतु काहीच न बोलल्याने पाकीट घरी राहिले आहे असे त्या बनावट उमेदवाराने सांगितले. त्यानंतर फॉर्मवर असलेली सही व बनावट उमेदवाराने केलेली सही यांची तुलना केली असता दोघांमध्ये फरक दिसून आला. थोड्या वेळानंतर पुन्हा राजेश सिंधी याने हेमंत नरेंद्र शर्मा या दुसर्‍या उमेदवाराचा फॉर्म आणला. यावर देखील संगणीकृत फोटो ऐवजी दुसरा फोटो चिटकविलेला असल्याने त्याला याबाबत विचारणा केली. यावर त्याने जाने दो साहब, पास कर दो असे तो म्हणाला. फोटोबाबत अधिकार्‍यांनी त्याला विचारणा केल्यास त्याने नजरचुकीने लावला गेले असल्याचे सांगितले.

कागदपत्रे फेकत केली अरेरावी
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गणेश ढेंगे हा त्याि ठकाणी आला. त्याने घनश्याम पाटील यांच्यासोबत अरेरावी करीत त्याच्या हातातील कागदपत्रे त्याने त्यांच्या टेबलावर फेकून दिली तसेच माझ्या उमेदवारांचे अर्ज पास करून द्या नाही तर मी तुम्हाला कामाला लावेन, असे म्हणत अरेरावी करीत त्याठिकाणाहून तो निघून गेला. याबाबत अधिकार्‍यांनी घडलेला प्रकार वरीष्ठांना कळविल्यानंतर त्यांना याबाबत पोलिसात तक्रार देण्याच्या सुचना केल्या. राजेश सिंधी याने चंदन फकिरसिंग, हेमंत नरेंद्र शर्मा व चेतन पांडुरंग पाटील या तिघांच्या फॉर्मवर बनावट फोटो, स्वाक्षरी व बनावट उमेदवार करून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी या तिघांसह धमकी दिल्याप्रकरणी राजेश सिंधी उर्फ सिक्का, गणेश ढेंगे यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !