धुळ्यात साडेसात लाखांची घरफोडी : आरोपी जाळ्यात
धुळे शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी : संपूर्ण मुद्देमाल हस्तगत
धुळे : शहरातील गरूड बाग भागात भरदिवसा अज्ञात चोरट्याने 5 रोजी सुमारे साडे सात लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती तर या प्रकरणी धुळे शहर पोलिसात 7 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतल्यानंतर त्याने अन्य एका आरोपीच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर संशयीत आरोपी गणेश अनिल मरसाळे (रमाबाई आंबेडकर नगर, देवपूर, धुळे) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून सात लाख 40 हजार रुपये किंमतीचा चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भर दिवसा लांबवला होता साडेसात लाखांचा मुद्देमाल
गरूड प्लॉट भागातील रहिवासी चंद्रजीत उदय सिसोदे (30, ग.स.बँकेशेजारी, धुळे) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 5 रोजी भर दिवसा सात लाख 40 हजारांचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी दहा ग्रॅम वजनाचा व 50 हजार रुपये किंमतीचा मोत्यांचा हार, 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किंमतीचा दोन पदरी मोत्यांचा हार, 25 हजार रुपये किंमतीचे कानातील झुमके, एक लाख रुपये किंमतीचे कानातील हिरे जडीत टॉप्स, 25 हजार रुपये किंमतीचा कर्णफुलांचा जोड, 25 हजार रुपये किंमतीची डायमंड अंगठी, 40 हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅमचे डायमंड असलेला कानातील जोड, एक लाख 75 हजार रुपये किंमतीच्या व 35 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या, दोन लाख रुपये किंमतीचा डायमंडचा सोन्याचा व मोत्यांचा हार मिळून सात लाख 40 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

यांनी आवळल्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे निरीक्षक नितीन देशमुख, सहा.निरीक्षक श्रीकांत पाटील, सहा.पोलिस उपअधीक्षक एन.एस.आखाडे, हि.शं.बैरागी, भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, सतीश कोठावदे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रवी गिरासे, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल पाटील, राहुल गिरी, अविनाश कराड, तुषार मोरे, प्रसाद वाघ, विवेक साळुंखे आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पालकाचा विश्वास संपादन करून विधी संघर्ष बालक ताब्यात
निरीक्षक देशमुख यांना ही चोरी एका विधी संघर्षीत बालकाच्या मदतीने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयीत बालकाच्या पालकांना बोलावून त्यांचा विश्वास संपादन केला व बालकाकडून माहिती केल्यानंतर या बालकासह संशयीत आरोपी गणेश अनिल मरसाळे (रमाबाई आंबेडकर नगर, देवपूर, धुळे) याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, विधी संघर्ष बालकाच्या समुपदेशनासह पुर्नवसनाच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्या. अटकेतील आरोपी मरसाळे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

