व्यापार्याची साडे तेरा लाखांची रोकड लांबवली : चौघे आरोपी जाळ्यात
धुळे स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी : दोन दुचाकींसह 14 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे : दुचाकीवरून जाणार्या कापूस व्यापार्याला दुचाकीला खाली पाडून त्याच्याकडील 13 लाख 54 हजारांची रक्कम चाकूच्या धाकावर लांबवण्यात आल्याची घटना कौठळ-तामसवाडी रस्त्यावर 9 रोजी सायंकाळी 6.45 वाजता घडली होती. या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 13 लाख 32 लाखांच्या रोकडसह दोन दुचाकी मिळून 14 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कापूस व्यापार्याच्या दुचाकीला लाथ मारत लांबवली रक्कम
कापूस व्यापारी संदीप शिवाजी पाटील (मांडळ, ता.अमळनेर) यांनी 9 रोजी कापूस विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेली 13 लाख 54 हजारांची रक्कम घेवून दुचाकीने मांडळ गावाकडे निघाले होते. बुधवारी पावणेसात वाजेच्या सुमारास कौठळ-तामसवाडी रस्त्यावरून दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी पाटील यांच्या दुचाकीला लाथ मारून दुचाकी पाडली व व्यापार्याकडील रक्कम असलेली पिशवी लांबवत पळ काढला होता. या प्रकरणी सोनगीर पोलिसात व्यापार्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून चौघांच्या आवळल्या मुसक्या
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व सहकार्यांना गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा चड्डा उर्फ देवेंद्र पांडुरंग गायकवाड (ुग.नं.5, धुळे) याच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. त्यानंतर संशयीताला 12 रोजी पहाटे चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असता त्याने व्यापार्यावर पाळत ठेवून त्याबाबतची माहिती आपल्या अन्य तिघा साथीदारांना देत गुन्हा घडवून आणल्याची कबुली दिली व त्यानंतर त्यास अटक करण्यात आली तसेच त्याचे साथीदार राहुल दिलीप परदेश (ग.नं.6, चैनी रोड, धुळे), आकाश एकनाथ दाभाडे (463, पश्चिम हुडको, पवन नगर, धुळे) व अभिजीत भरतसिंग राजपूत (मडाणे, ता.जि.धुळे) यांनाही अटक करण्यात आली. आरोपी चड्डाच्या घरातून 13 लाख 32 हजारांची रोकड तसेच 80 हजार रुपये किंमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींना पुढील कारवाईसाठी सोनगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक हनुमान उगले, हवालदार संजय पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, किशोर पाटील, अशोक पाटील, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.

