धुळ्यानजीक 43 वर्षीय इसमाचा खून
मयत भंगार विकून करीत होता उदरनिर्वाह
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंप्री शिवारात अनोळखी इसमाचा शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला होता. या इसमावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मयताची ओळख पटली असून तो व्यवसायाने भंगार व्यावसायीक असून सुनील माळी (43, बेटावद, ह.मु.धुळे) असे त्याचे नाव असल्याचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सांगितले.
अज्ञात मारेकर्यांचा कसून शोध
मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या एका ढाब्याजवळ नाल्यानजीक अनोळखी इसमाचा शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला होता. याबाबतची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक विलास ठाकरे, मोहाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी योगेश राजगुरू व कर्मचार्यांनी धाव घेतली. मयताच्या डोक्यात, उजव्या डोळ्याजवळ, पायावर तसेच इतर ठिकाणी वार करून खून करण्यात आला असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही शिवाय मारेकर्यांची ओळख पटली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मयत हा भंगार गोळा करून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली तसेच मयताची पत्नी मुलांनी घेवून विभक्त राहत असल्याचेही समजते.


