ट्रकच्या धडकेत दोघा भावंडांचा मृत्यू
वाघाडी फाट्यावर अपघात : गतिरोधकासाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला
सोनगीर : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघा भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना वाघाडी फाटा येथे रविवारी दुपारी घडली. या अपघातात अण्णा सुकदेव सोनवणे (40) व त्यांचा भाऊ देविदास सुकदेव सोनवणे (43, दोन्ही भडगाव वर्धाने, ता.साक्री) अशी मयतांची नावे आहे. दोघी भावंडे दुचाकीने शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे दुचाकीने जात असताना महामार्ग ओलांडत असताना भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, गतिरोधकाच्या मागणीसाठी अर्धा ते पाऊण तास मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला़
ग्रामस्थांनी रोखला महामार्ग
सोनवणे भावंडे दुचाकी (एम.एच.15 सी.ए.3750) ने वालखेडा जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना शिरपूरहून धुळ्याकडे येणारा भरधाव ट्रक (जी.जे.03 बी.डब्ल्यू.9881) ने दुचाकीला जोरदार डक दिली. अपघातात अण्णा सोनवणे जागीच ठार झाले तर देविदास सोनवणे यांचा उपचार सुरू असताना त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. वाघाडी फाट्यावर गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्गावर अधार्तास रास्तारोको आंदोलन केले. दोन दिवसात गतिरोधक बसविण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. अपघात प्रकरणी ट्रक चालक संजय लालजी यादव (27, रा़ मांडवा, जिल्हा जौनपुर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.


