आठ गावठी कट्ट्यांसह पंजाबमधील तिघे शस्त्र तस्कर जाळ्यात
सांगवी पोलिसांची भल्या पहाटे कारवाई : सहा जिवंत काडतूस व कारसह पाच लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे : पंजाब राज्यातील काही शस्त्र तस्कर अग्निशस्त्र खरेदीसाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात दाखल झाल्याची गोपनीय माहिती शिरपूरचे तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक अभिषेक पाटील व नाईक चत्तरसिंग खसावद यांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. मंगळवरी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सांगवी-वरला रस्त्यावरील जोयदा गावाजवळ पंजाब पासिंगची कार येत असल्याचे पाहताच पोलिसांनी नाकाबंदी करीत कार अडवली व कारमधील तिघा संशयीतांची झडती घेतली असता गावठी आठ गावठे कट्ट्यांसह सहा जिवंत काडतुस, तीन मोबाईल व 15 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी सुखविंदरसिंह प्रकाशसिंह शीख (21 रा. बुलेरीयन, ता.मलोट, जि.मुखसर, पंजाब) लवदीपसिंह दलजितसिंह जाट (23 रा़ कोटईशिका ता.धरमकोट, जि.मोघा, पंजाब), दरजनसिंह बलविंदसिंह जाट (30, रा. गुरुतेग बहादर नगर, ता.फरिदकोट, पंजाब) यांना अटक करण्यात आली.
शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल
तीनही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात हवालदार संभाजी वळवी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख रुपये किंमतीच्या आठ गावठी पिस्टल, एक हजार 200 रुपये किंमतीचे सहा जिवंत काडतूस, 15 हजारांची रोकड व 16 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल व तीन लाख रुपये किंमतीची चारचाकी (पी.बी.23 ए.एफ.4564) मिळून पाच लाख 32 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करीत आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका (सांगवी) पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, संभाजी वळवी, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी यांच्या पथकाने केली. दरम्यान, मंगळवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परीषद घेवून कारवाईची माहिती दिली.

