बसमध्ये चढताना विवाहितेचे मंगळसूत्र लांबवले
शिरपूर : शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावरून अंकलेश्वर जाणाऱ्या बसमध्ये चढतांना अज्ञात चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना २ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
प्रियांका धर्मराज पवार (२०, रा. कमखेडा, ता.शिंदखेडा) या महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला ही अंकलेश्वर बसने खापर येथे जाण्यासाठी पती धर्मराज पवार सोबत शिरपूर बस स्थानकावर आली होती. शिरपूर स्थानकावर जळगांव अंकलेश्वर बस आल्याने बसमध्ये चढतांना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी मंगळसुत्र कापल्याचे लक्षात आले. त्यानंतर सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक धनगर करीत आहेत.
चोरटी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
बस स्थानक चोरी प्रकरणी शहर पोलीसांनी करीना मिलन शिंदे (२०, रा.वजीरखेडा, ता.भोकरदन, जि.जालना) या तरुणीला संशयास्पद हालचाली वरून बसस्थानकावरून ताब्यात घेतले. तरुणीने चोरी केल्याचे कबुल करीत पोलिसांना मुद्देमाल काढून दिला आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. महिला आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


