मांडूळ तस्कर वनविभागाच्या जाळ्यात
नवापूरात कारवाई : मांडूळ प्रजातीच्या सापासह चारचाकी वाहनही जप्त
नवापूर : शहरातून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोन तस्कर मांडूळ तस्करी करीत असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून एक मांडूळ प्रजातीचा साप, एक मारुती सुझुकी अल्टो वाहन जप्त केले. आरोपींसह मुद्देमाल वन विभागाकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली. अरमान अब्दुल व मजीत मकराण अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना अक्कलकुवा येथून अटक करण्यात आली. आरोपींना 8 जानेवारी 2021 पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली.
गुजरात राज्यात धागेदोरे
या मांडूळ तस्करीचे धागेदोरे गुजरात राज्यात गेल्याचे बोलले जात आहे. मांडूळ साप घरात आणल्याने रातोरात मनुष्य करोडपती होतो, असा अनेक दशकापासून गैरसमज आहे. मार्केटमध्ये त्याची मोठी किंमत असल्याने त्यामुळे या मांडूळाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे वनसंरक्षक दि.वा.पगार, नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक सुरेश केवटे, विभागीय वन अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखालीसहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबारचे धनंजय पवार, नवापूर वनक्षेत्रपाल आर.बी.पवार यांच्या पथकाने केली आहे.

