42 लाखांचे अपसंपदा प्रकरण : गावीत दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर


धुळे : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू तथा मुंबई मंत्रालयातील माजी कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार गावीत व त्यांच्या पत्नी तथा तत्कालीन पोलिस निरीक्षक इला गावीत यांच्याविरुद्ध सुमारे 42 लाखांची अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गत डिसेंबर महिन्यात धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच नंदुरबार एसीबीच्या पथकाने गावीत यांच्या नटावद व नंदुरबार शहरातील झर झडती घेतली होती. यानंतर पोलिस पथक गावीत दाम्पत्याचा शोध घेत असताना धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आल्याने गुरुवारी तो मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा ठपका
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील रहिवासी असलेले राजेंद्रकुमार कृष्णराव गावीत हे 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या पत्नी इला गावीत या पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना सात वर्षांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान 2005 ते 2013 पर्यंतच्या गावीत यांच्या अर्जित शासकीय संपदा व खर्च यांची चौकशी व ताळमेल घालण्यात आला. त्यातून गावीत यांच्याकडे आपल्या उत्पन्नापेक्षा 42 लाख 49 हजार 340 रुपयांची अपसंपदा मिळून आली तर त्यांच्या पत्नी ईला गावित यांनी अपसंपदा आपल्या नावे करून सहकार्य केल्याचे चौकशीतून समोर आल्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुर्‍हाडे यांच्या फिर्यादीवरून सोमवार, 28 डिसेंबर रोजी रात्री धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एसीबीकडे हजेरी लावण्याचे आदेश
धुळे सत्र न्यायालयाने गावीत दाम्पत्याला 11 ते 16 जानेवारी दरम्यान धुळे एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश अटकपूर्व जामीन मंजूर करताना दिले आहेत. तपास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक झोडगे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !