विजेच्या जोरदार धक्क्याने युवकाचा मृत्यू
शिरपूर : आठवडे बाजार निमित्ताने नास्तासाठी लोटगाडी लावत असतांना एका युवकाचा विजेचा जोरदार झटका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वरुळ मंगळवार, 12 जानेवारी रोजी सायंकाळी घडल्याने गावात शोककळा पसरली. गणेश शालिक कोळी (28, रा.वरुळ) असे मयत युवकाचे नाव आहे.
लोटगाडीत उतरला वीज प्रवाह
गणेश कोळी हा तरुण वरुळ गावातील बस स्थानकावर सायंकाळी नाश्त्यासाठी लोटगाडी लावत असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास अगोदरच लोटगाडीत विजेचा प्रवाह असल्याने त्याला विजेचा जोरदार झटका लागला. जागीच प्रथमोपचार करून प्रकाश रघुनाथ कोळी याने 5 वाजेच्या सुमारास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.खान यांनी गणेश शालिक कोळी याची तपासणी केली असता मयत घोषित केले. वार्डबॉय सावता माळी याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार नारायण ठाकरे हे करीत आहेत.


