समर्पन निधीसाठी महिलाही सरसावल्या
15 रोजी रामधून भक्तीफेरीचे आयोजन : जिल्हाभरात विविध उपक्रम
भुसावळ : अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर लवकरच राम मंदीराचे भव्य असे निर्माण होणार आहे. त्या निर्माण कार्यासाठी हातभार लागावा यासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे संपूर्ण देशभरात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान श्रीराम मंदीर समर्पन निधी अभियान राबविण्यात येणार आहे. भुसावळ जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध स्तरावर बैठका घेण्यात येत आहे. भुसावळ शहरातील महिलांनी या संदर्भात बैठक घेतली. त्यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांनी या अभियानात आपले योगदान असावे म्हणून वेगवेगळे उपक्रम सुचविले.
15 रोजी राम धून भक्तीफेरी
15 जानेवारी रोजी शहरातून राम धून भक्तीफेरी तसेच महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
बैठकीला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संत्संग सहप्रमुख नारायण घोडके यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, श्रीराम मंदीर हे भारतीय आस्थेचे प्रतिक आहे. या मंदीराच्या लढ्यामध्ये अनेकांनी आपले जीवन दानदिले आहे. आज जरी मंदीर निर्माण कार्य सोपे झाले असले तरी या संघर्षाचा काळ अत्यंत कठीण होता. आपल्या पूर्वजांनी अनेक बलिदाने देवून हा संघर्ष निरंतर सुरू ठेवला त्यामुळे हे मंदिराचा लढा यशस्वी झाला व आज मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी कल्याणी ओक यांनी प्रास्ताविक केले. अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या. महिलांनी समर्पण अभियान राबविण्याबाबत चर्चा केली व शहरात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले.


