मोबाईलवर आत्महत्येची कृती पाहत स्वतःही संपवले जीवन
जळगाव : मोबाईलवर आत्महत्येची कृती पाहत 13 वर्षीय बालकाने स्वतःही जीवन संपवल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता तुकारामवाडीत घडली. हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (13, रा.धुरे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) असे मयताचे नाव आहे. गेल्या चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकारामवाडीतील मामा दीपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. आजी काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्याने मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाईट बघितल्या व यानंतर बाथरूममध्ये जाऊन साडी बांधून गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला. तुकाराम वाडीतील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी मृतदेह तातडीने खासगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविला असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

