भुसावळातील रेल्वे अप्रेंटिसधारकांचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा
भुसावळ : रेल्वेच्या अप्रेंटीसधारक युवक-युवतींनी शुक्रवारी एनआरएमयू पदाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. रेल्वे प्रशासनाकडून सेवेत सामावून घेण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने दिल्लीत आंदोलन छेडण्याचा इशारा अप्रेंटीसधारकांनी दिला. रेल्वेत अॅप्रेटीस केलेले सुमारे 400 उमेदवार भुसावळात एकत्र आले होते. सर्वांनी एनआरएमयू कार्यालय गाठून पदाधिकार्यांना निवेदन दिले. अॅप्रेटींसधारकांचे प्रश्न एनआरएमयूने सोडवावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एनआरएमयू कार्यालयात बैठक झाली. रेल्वे मंत्र्यांनी अप्रेंटिसधारकांची बाजू ऐकून न घेतल्यास, ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाळ मिश्रा यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करू. या आंदोलनास वेगळे वळण मिळाल्यास त्यास केंद्र सरकार जबाबदार असेल, असे अप्रेंटीसधारक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत परदेशी यांनी सांगितले.

