थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा : उपमुख्यमंत्र्यांनी दिली कारवाई न करण्याची ग्वाही
मुंबई : विधी मंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी सुरूवात होताच अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजबिल आणि वीज खंडित करण्याच्या निर्णयावरुन सभागृहात विविध प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील घरगुती आणि शेतकर्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिल्याने थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फडणवीस यांच्या मागणीला आले यश
वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात असून दुसरीकडे राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आले आहेत. यात सर्वाधिक शेतकरी भरडला जात आहे. त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतीच्या कामांवरही संकट आलं आहे त्यामुळे तत्काळ या विषयावर चर्चा घडवून आणावी आणि वीज कनेक्शन तोडणं थांबवावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर अजित पवार म्हणाले की, विजेचा विषय हा ऊर्जा खात्याचा आहे. त्यावर या सभागृहात चर्चा देखील होणार आहे. त्यामुळे विजेच्या विषयवर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील वीज ग्राहक आणि शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. अजित पवारांच्या या तात्काळ निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच ज्यांचा आतापर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आले आहे, त्यांना वीज पुरवठा पुन्हा जोडून द्यावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

