भुसावळ शहरातील कोचिंग क्लासेस सुरू करावेत


पालकांसह सामाजिक संस्थांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ : सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळ 1 मार्च 2021 च्या सरकारी नियमावलीनुसार लॉक डाऊन 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे. सद्यस्थितीत इतर सर्व व्यवसाय सुरू असतांना दुसरीकडे मात्र नियमांचे पालन करणारे असे सुशिक्षित बेरोजगार कोचिंग क्लासेस अथवा ट्युशन घेत असल्यास मज्जाव करण्यात येत आहे यामुळे दुहेरी संकट निर्माण होत आहे. ही परीस्थिती लक्षात घेता महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी प्रांताधिकारी, मुख्याधिकारी व डीवायएसपी यांना निवेदन देण्यात आले .

यांनी दिले निवेदन
सखी श्रावणी महिला मंचच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांच्यासह हृषीकेश पवार, दिनेश पवार, अनिल साळुंखे, गिरीश शिंदे, युवराज सपकाळे, संदीप कुकरेजा, अर्चना बंड, राहुल पांडव, काझी, अग्रवाल, संगीता लुल्ला आदी उपस्थित होते.


क्लासेस बंदमुळे कोसळले संकट
मार्च महिन्यापासून कोरोना संकट ओढवल्यानंतर क्लासेस चालविणार्‍यांसह त्यांच्या परीवाराची स्थिती अत्यंत बिकट आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे विशेष करून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्तमान व भविष्य टांगणीला लागले असून आज कोचिंग क्लासेस हा शैक्षणिक क्षेत्रातील एक अविभाज्य घटक व विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देणारे असे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. शहरासह बाजार परीसरात, सामाजिक कार्यक्रमात शाळकरी मुले-मुली वावरत असतात तेव्हा त्यांच्या स्वास्थ्य विषयक प्रश्न निर्माण होत नाहीत मग शिस्तीत शिक्षण घेताना काय अडचण? इतर जिल्ह्यातील विद्यार्थी योग्य व अखंडित शिक्षण घेत असताना आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान नको यासाठी वरिष्ठ पातळीवरुन यातून काही मार्ग काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. इतर व्यवसायाप्रमाणे अटी व शर्तीनुसार व कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करीत क्लासेस सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !