अमोदा-भिकनगाव रस्त्याचे संथगतीने : वाहनधारकांमध्ये नाराजी
सावदा : सावदा शहराजवळील बसस्थानक परीसराजवळ हायब्रीड एन्युइटी अंतर्गत राज्य मार्ग आमोदा-भिकनगाव या रस्त्याचे काम सुरू असलेतरी हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता आमोदा-पिंपरूळ-सावदा-खिरोदा-पालमार्गे भिकनगाव असून यात आमोदा ते सावद्यापर्यंत तसेच खिरोदा ते सावद्यापर्यंत रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून खिरोदा ते पाल घाटातदेखील रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे काम मंजूर झाल्यानंतर खूप उशिराने सुरु झाले. यात आता सावदा येथे रींग रोड ते साई बाबा मंदिरापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. सध्या साई बाबा मंदिर ते कोचुर रोड, महेंद्र हॉटेल पर्यंतचे काम सुरू आहे. हे काम जवळपास एक महिन्यापासून सुरू असून अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असल्याने या परीसरातील व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील प्रभावीत झाली आहे. काम संथगतीने सुरू असल्याने व्यापार्यांच्या दुकानात येणारे गिर्हाईक यांनादेखील कसरत करावी लागत आहे. कामाला वेग देवून काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या मार्गावर नगरसेवक राजेश वानखेडे यांनी रस्ता दुभाजक टाकण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने अधिकारी यांनी पाहणी देखील केली व ही मागणी मंजूर केली आहे. खिरोदा ते पाल दरम्यान घाटातदेखील या रस्त्याचे काम सुरू असून येथे अनेक वळणे आहेत मात्र याठिकाणी कोणतेही काम सुरू असल्याचे फलक लावण्यात आले नसल्याने घाटातून वाहन धारकांना याची पूर्वकल्पना येत नसल्याने मोठी अडचण येत आहे. घाटासारख्या ठिकाणी असे अक्षम्य दुर्लक्ष करून चालणार नसल्याने अधिकारी वर्गाने या सर्व बाबींकडे लक्ष पुरवावे, अशी देखील अपेक्षा नागरीकातून व्यक्त होत आहे.

