चोरट्यांची सुसाट एक्स्प्रेस : वेगवेगळ्या चार घटनेत लाखोंचा ऐवज लंपास
भुसावळ : आरक्षीत गाड्यांमध्ये चोर्या होवू लागल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. पुणे-दानापूर रेल्वे गाडीतून धीरजकुमार गौतम (रा.संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) हे या गाडीच्या एस-9 या डब्याच्या सीट 7 व 8 वरून प्रवास करीत असतांना त्यांच्या पत्नीचा झोपेचा फायदा घेत मनमाड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी चोरट्याने महिलेची लाल रंगाची पर्स लांबविली. त्यात 10 हजार रूपये रोख, दिड ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, मेकअपचे साहित्य असा 18 हजारांचा ऐवज होता. दुसर्या घटनेत चेन्नई-अमदाबाद नवजीवन एक्स्प्रेसच्या एस- 5 या डब्यातील 43 व 44 नंबरच्या सीटवरून भाग्यलक्ष्मी सुब्रमण्यम (रा. शंकर नगर, चैन्नई) या चेन्नई ते अहमदाबाद असा प्रवास करीत असतांना गुरूवारी पहाटे 5.30 वाजता अकोला रेल्वे स्थानकाजवळ सुब्रमण्यम यांची पर्स चोरट्यांनी झोपेचा फायदा घेत चोरून नेली. यात दोन हजार रुपये रोख, एटीएम कार्डसह अन्य साहित्य मिळून 24 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तिसर्या घटनेत नवजीवन एक्स्प्रेस या गाडीतील एस-4 या डब्यातील सीट 43 वरून वरंगण ते सूरत असा प्रवास करीत असलेले राहूलकुमार शेट्टी हे यांची बॅग चोरट्यांनी लांबविली. त्यात 45 हजार रुपयांचे लॅपटॉप, हेडफोन असा 47 हजार रूपयांचा ऐवज होता. चौथ्या घटनेत एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस या गाडीतून संपत प्रजापती (रा.महुवा, बलराम नगर, उत्तर प्रदेश) हे शुक्रवारी एस-2 या डब्यातील 66 नंबरच्या सीटवरून प्रवास करीत असतांना नाशिकरोड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी प्रवासी झोपल्याचा फायदा घेत त्यांच्या खिश्यातील 50 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवले. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

