21 विद्यार्थ्यांचा पालकांना धनादेश वाटप
राजीव गांधी अपघात विमा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत लाभ
फैजपूर : जळगाव जिल्ह्यातील राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परीषद, जळगाव कार्यालयास 21 विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 75 हजार रुपयांप्रमाणे धनादेशाचे नुकतेच वितरण शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील व जिल्हा परीषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
25 प्रस्तांवाना मंजुरी
राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परीषद, जळगाव कार्यालयास 25 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी मागील वर्षातील सहा प्रस्ताव मान्य करण्यात आले त्या विद्यार्थ्यांना अनुदान देणे बाकी होते त्याप्रमाणे मागील सहा व चालू वर्षातील 15 असे एकूण 21 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75 हजार रुपयांप्रमाणे 15 लाख 75 हजार रुपयांचा धनादेश संबंधित विद्यार्थ्यांचे पालक व शाळेचे मुख्याध्यापक यांना शिक्षण समितीच्या सभेमध्ये देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, आर.एस.सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शिक्षण समितीच्या सभेमध्ये झालेल्या बैठकीत कोरोना आजारांचा वाढता प्रभाव पाहता शिक्षक हजेरी प्राथमिक-माध्यमिक पाहता 50 टक्के हजेरी बाबत आदेश देण्यात आले. शाळेतील संरक्षण भिंतीच्या कामकाजाच्या परीस्थितीबाबत आढावा घेण्यात आला व शाळा दुरुस्तीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे या बाबतच्या सूचना शिक्षण सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांनी दिल्या. शिक्षण समितीच्या ऑनलाईन झालेल्या सभेत जिल्हा परीषद सदस्य पोपट तात्या भोळे, नंदा पाटील, प्रमिला पाटील, गजेंद्र सोनवणे, रेखा राजपूत, रवींद्र नाना पाटील, हरीश पाटील उपस्थित होते. गुरुनंदन सूर्यवंशी, प्रवीण पाटील व स्विय सहाय्यक कांतीलाल पाटील यांनी सहकार्य केले.
