मुख्य रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी मुख्याधिकार्‍यांना साकडे


शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिले निवेदन : कामांना लवकरच होणार सुरूवात : मुख्याधिकारी

भुसावळ : सुमारे एक महिन्यापूर्वी जळगांव रोडवरील लोणारी हॉल ते जुना सातारा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, त्याच वेळेस लोणारी हॉल ते नवोदय चौफुली दरम्यानचा रस्ता नूतनीकरण करणे अपेक्षित होते. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे. लहान-मोठे अपघात तर रोजच होत आहे. भुसावळ शहरात अनेक ठिकाणी नवीन रस्ते तयार होत असतांना या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते माजी नगरसेवक दीपक धांडे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे यांनी केली आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे अपघात नित्याचे
रेल्वेच्या दोन कर्मचार्‍यांचा अपघात जळगाव रोडवर झाला. सुदैवाने तेथे जीवितहानी झाली नाही. रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी पथदिवे नाहीत तर काही ठिकाणी वाकलेले आहेत. यावल, रावेरकडून जळगांवकडे जाणार्‍या अवजड वाहनांची वर्दळ रोजचीच असते. खड्डेमय रस्त्यावर रात्रीच्या अंधारात मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेच्या जुना सातारा येथील विभागीय कार्यालयात परीसरातील महिला, वकील, पत्रकार, विद्यार्थी, वाहन चालक आणि ज्येष्ठ नागरीकांनी समस्या मांडल्या होत्या.


रस्त्याचे लवकरच नुतनीकरण होणार : मुख्याधिकारी
नागरीकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. इतर मुख्य रस्त्यांप्रमाणे डागडुजी न करता रस्ता नूतनीकरण करण्यात येईल. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, असे आश्वासन भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी या प्रसंगी दिले.

पंतप्रधान आवस योजनेची दुसरी यादी त्वरित प्रसिद्ध करावी : दीपक धांडे
गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान आवास योजनेतून आपले हक्काचे घरे बांधण्यासाठी लाभ मिळावा यासाठी शहरातील अनेक लाभार्थींनी भुसावळ नगरपालिकेकडे फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे परंतु प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेची दुसरी यादी प्रसिध्द न झाल्याने लाभार्थी ह्या योजनेपासून वंचित राहत आहे. या लाभार्थीची यादी त्वरीत प्रसिध्द करावी अन्यथा नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत त्यांच्या हक्कासाठी शिवसेनासुद्धा आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी दिला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !