केर्हाळा खुर्द ते मंगरूळ शेत शिवार रस्त्याचे व्हावे काम
रावेर : तालुक्यातील केर्हाळा खुर्द ते मंगरूळ शेत शिवार रस्त्याचे शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत शिव रस्ता मोकळा करून मजबुतीकरण करून मिळण्याची मागणी केर्हाळा येथील शेतकर्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. केर्हाळा खुर्द ते मंगरूळ हा शिवरस्ता असून या रस्त्याचा वापर या दोन्ही गावातील शेतकरी कायमस्वरूपी करीत असतात मात्र या रस्त्यावर काही शेतकर्यांनी अतिक्रमण केले आहे. हा रस्ता मोकळा करावा यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन ठराव केलेला आहे. शासनाच्या शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत या रस्त्याचे काम करून शेतकर्यांना सुविधा मिळावी अशी येथील शेतकर्यांची रास्त अपेक्षा आहे. तसेच या शिवारात जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्याचा वापर होत असतो. पावसाळ्यात केळी वाहतुकीसाठी शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत केर्हाळा दूध डेअरीचे चेअरमन चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र इंगळे, जनार्दन पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या सह्या आहेत . या मागणीचे निवेदन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले आहे.

