गुटख्याची तस्करी : ट्रालासह 33 लाखांचा गुटखा जप्त
शहादा : गुजरात-राज्यातून मध्यप्रदेशात अवैधरीत्या गुटख्याची तस्करी करणारा ट्रॉला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडला असून वाहनासह 33 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करीत पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
गुजरात राज्यातील वापी येथून विमल गुटख्याच्या पोती भरुन ट्रॉलाच्या माध्यमातून मध्यप्रदेश येथील एका मोठ्या व्यापार्याकडे घेवून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना मिळाली . त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या नंदुरबार पथकाने प्रकाशा येथे सापळा रचला असता गुजरात राज्याकडून प्रकाशाकडे येणार्या संशयीत ट्रॉला थांबविला असता या ट्रॉल्यात 15 लाख रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला विमल पानमसाला गुटख्याच्या पोती आढळून आल्या . या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात ट्रॉला चालकासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह 33 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे . सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या पथकाने नुकतीच केली .


