भुसावळात कोरोना लसीकरणाला बीएसएनएल सेवा खंडीतचा फटका
सहा केंद्रांसाठी केवळ 500 डोस मिळाले
भुसावळ : दोन दिवसांपासून बंद असलेले कोरेाना प्रतिबंधक लसीकरण सोमवारी सुरु झाले मात्र सकाळी पहिल्या टप्यात केवळ 250 डोस मिळाले. तर दुपारनंतर 250 डोस प्राप्त झाले. याच दरम्यान दुपारी 12 वाजता बीएसएनएलची इंटरनेट सेवा खंडीत झाल्याने कोविन अॅपवर नोंदणी अभावी लसीकरण खोळंबले. शहरात कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी वाढत आहे. लसीकरणासाठी नागरिक आता स्वत: पुढे येत आहेत. कोरेानाचा प्रकोप करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याबाबत प्रबोधन झाले, मात्र आता लोकांचा प्रतिसाद वाढल्यानंतर लस उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. भुसावळात सोमवारी सकाळी केवळ 250 लस मिळाल्या. त्या सहा केंद्रांना समान वितरीत झाल्या. सकाळी उशिराने लस मिळाल्यामुळे बद्रीप्लॉट केंद्रावर लसीकरण झाले नाही. या केंदावर अधिक गर्दी असताना लस दिल्या जात नाहीत. यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परतावे लागत आहे. यानंतर दुपारी पून्हा 250 डोस मिळाले. मात्र याच दरम्यान दुपारी12 वाजता जळगाव-औरंगाबाद दरम्यान बीएसएनएलची केबल खंडित झाल्यामुळे संपूर्ण बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प झाली. इंटरनेट नसल्याने कोविन अॅपवर नोंदणी व व्हेरिफिकेशन करणे कठीण झाले. यामुळे दुपारनंतर बहूतांश सर्वच केंद्रांवर कोरोनाचे लसीकरण थांबले. सकाळी पहिल्या टप्प्यातच लसीकरण सुरळीत झाले. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता लसीकरणाचा वेग वाढत असतानाच लस मिळत नसल्याची स्थिती आहे. नागरीकांना केंद्रावर हेरझार्या घालाव्या लागत आहेत.




