एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तीन अधिकारी, क्लासचालकासह सहा आरोपींना अटक
मुंबई (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या प्रकरणात एमपीएससीच्या तीन अधिकार्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये खासगी क्लासचालक, संबंधित उमेदवाराच्या नातेवाईकांसह अन्य व्यक्तींचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तक्रारीनंतर या पदांच्या परीक्षा रद्द
दरम्यान, पेपरफुटीच्या तक्रारी आणि तपासातील निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने औषध निरीक्षक, गट-ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पदासाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून आधी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.



तीन एमपीएससी अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
औषध निरीक्षक परीक्षेतील प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याच्या प्रकरणात एमपीएससीमधीलच काही कर्मचार्यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने एमपीएससीच्या तीन अधिकार्यांना अटक केली याशिवाय या प्रकरणाशी संबंधित खासगी व्यक्तींनाही अटक करण्यात आली. यामध्ये क्लासचालक आणि संबंधित परीक्षार्थ्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण सहा आरोपींना अटक झाल्यानंतर आता त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
साखळी समोर येण्याची शक्यता
या चौकशीतून पेपरफुटीची संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रक्रियेत कोणकोणत्या व्यक्तींना प्रवेश होता, त्यापैकी कोणाकडून प्रश्नपत्रिका बाहेर गेली आणि ती पुढे कशी पोहोचवण्यात आली, याचा तपास केला जात आहे.
‘प्रेमप्रकरणा’तून पेपरफुटीचा धक्कादायक दावा
या प्रकरणाच्या तपासात एका कथित प्रेमप्रकरणाचा धागा समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका उमेदवाराला परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तिच्याशी संबंधित व्यक्तीने एमपीएससीतील कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्यांशी संपर्क साधल्याचा संशय आहे. याच माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळवून देण्यात आल्याचा प्राथमिक तपासातील दावा आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या तपासानुसार फुटलेला प्रश्नसंच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये वितरित झाल्याचे स्पष्ट झालेले नसून तो एका उमेदवारापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे मात्र एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचा संशय असला तरी संपूर्ण परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आयोगाने परीक्षा रद्द केली. त्यामुळे पेपरफुटीचा गैरफायदा न घेतलेल्या शेकडो उमेदवारांनाही त्याचा फटका बसला आहे.
22 मार्चला झाली होती परीक्षा
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी एमपीएससीने 29 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी एकूण 506 उमेदवार पात्र ठरले. यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. 22 जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आयोगाने तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 485 उमेदवार पात्र आणि तीन उमेदवार अपात्र ठरले होते. मात्र, त्यानंतर परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारी आणि पुरावे समोर आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
आधी आरोप फेटाळले, नंतर परीक्षा रद्द
पेपरफुटीचा आरोप समोर आल्यानंतर सुरुवातीला एमपीएससीकडून हा आरोप मान्य करण्यात आला नव्हता. मात्र, काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान एका उमेदवाराला प्रश्नसंच आधी मिळाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले. अखेर एमपीएससीने औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयोगाच्या निर्णयामुळे आता या पदासाठी पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आहे.

