शिक्षकानेच मोडला कायदा : अल्पवयीन बालिकेशी केला विवाह
धुळे : ज्ञानार्जनाचे धडे देणार्या शिक्षकानेच चक्क अल्पवयीन बालिकेशी विवाह करीत कायद्याचा भंग केल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडली. निजामपूर पोलिस ठाण्यात शिक्षकासह अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. देवीदास पदमोर (रा.हट्टी खुर्द), अशोक हालगीर व लताबाई हालगीर (दोन्ही रा.उडाणे, ता. धुळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे असून ससंशयीतांनी 2 मार्चला शेतातच अल्पवयीन मुलीचा गुपचूप विवाह उरकल्याचा आरोप आहे. संशयीत आरोपी शिक्षक देवीदास पदमोर ( 40) हा नंदुरबार तालुक्यातील अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षक असल्याचे व त्याचा यापूर्वी घटस्फोट झाल्याचे समजते.
ग्रामसेवकांनी दिली फिर्याद
धुळे जिल्हा बालकल्याण समितीच्या 9 एप्रिलच्या पत्रानुसार हा गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश पारीत झाला. हा आदेश 24 एप्रिलला हट्टी खुर्द येथील ग्रामसेवकास प्राप्त झाल्याने ग्रामसेवक विजय बोराडे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


