स्वॅब तपासणी कीटची टंचाई : पालिकेने मागवल्या 20 हजार कीट
जिल्हाधिकार्यांना लवकरच डीडी देणार : मुख्याधिकार्यांची माहिती
भुसावळ : कोरोना रुग्णांचा सातत्याने वाढणारा फैलाव पाहता नागरीकांची तपासणी वाढवण्यात आल्यानंतर शहरात बुधवारी केवळ 327 जणांचीच तपासणी करण्यात आली तर अत्यावश्यक असलेल्यांचीच स्वॅब तपासणी केली जात आहे. पालिकास्तरावरच कीटची खरेदी करावी, असे जिल्हा प्रशासनाने सूचित केल्यानंतर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी स्थानिक स्तरावर 20 हजार कीट खरेदीचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर तातडीने डीडी देण्याच्या हालचाली सुरू केल्या असून दोन दिवसात कीट उपलब्ध होतील, असा आशावाद बोलताना व्यक्त केला.
पालिकेकडे उरले अवघे 500 कीट
शहरात सहा ते सात ठीकाणी कोरेाना स्वॅब तपासणी केली जात होती, प्रशासनाकडून प्रत्येक नागरीकांचे स्वॅब तपासणी करण्याच सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्याने तपासणी करण्याच्या कीटची 24 एप्रिलपासून टंचाई निर्माण झाली आहे. अवघे 500 कीट पडले असून ते आठवडाभर पुरवायचे आहे. दरम्यान, या संदर्भात मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले की, पालिका स्तरावरून 20 हजार कीट खरेदी करण्यात येत असून डीडी जिल्हाधिकार्यांना देण्याची प्रकिया सुरू असून दोन दिवसात कीट उपलब्ध होणार आहेत.



