भ्रष्टाचार भोवला : धुळे आदिवासी प्रकल्प अधिकारी अखेर निलंबित
धुळे : आदिवासी विकास कामांच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत आदिवासी प्रकल्प कार्यालयातील तत्कालिन आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अनुसूचित जमाती प्रमाणापत्र तपासणी समितीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी राजाराम निळू हाळपे यांना निलंबीत करण्यात आले आहे. शासनाने झालेल्या अनियमिततेसंदर्भात नागरी सेवा शिस्त व अपील अधिनियमांतर्गत राजाराम हाळपे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती येथील मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय त्यांना सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच चौकशीदरम्यान हाळपे यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसून, असे आढळून आल्यास शासन आदेशानुसार हाळपे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

