बोदवड शहर कडकडीत बंद : राष्ट्रवादीच्या आवाहनाला प्रतिसाद
बोदवड- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व विधी मंडळ पक्षनेते आमदार अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात कुठलाही संबंध नसताना भाजपा सरकारने दबाव तंत्राचा वापर करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादीने बोदवड शहर बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली.
घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात जाणुन बुजून घेत त्यांच्यावर सरकारने सुडबूध्दीने व मनमानी कारभार चालवीत ईडीमार्फत गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप यावेळी बोदवड तालुका राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. यावेळी शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बोदवड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गर्दी केली. यावेळी ‘एकच वादा अजित दादा व ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणा देण्यात आल्या. बुधवारी बाजारपेठेत फिरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे गटनेते देवेंद्र खेवलकर, नगरसेवक जीवन पालवे व कार्यकर्त्यांनी व्यापार्यांना गुरुवारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आव्हान केले. या आवाहनाला व्यापारी मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद देत गुरुवारी आपापली दुकाने बंद ठेवली.