बीएचआर घोटाळा : प्रेम कोगटांसह 12 जणांना अटक
जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात पुणे गुन्हे आर्थिक शाखेने गुरूवारी पहाटे एकाचवेळी छापेमारी करीत तब्बल 12 जणांना अटक केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. अटकेतील संशयीतांमध्ये ख्यातनाम कोगटा डाळ उद्योगाचे सर्वेसर्वा प्रेम कोगटा, जळगाव शहरातील सराफ तथा हॉटेल व्यावसायीक भागवत भंगाळे, भुसावळचे आसीफ मुन्ना तेली, जामनेर येथून पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे यांच्यासह 12 जणांचा अटकेतील आरोपींमध्ये समावेश आहे. एकाचवेळी सहा पथकांनी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.
आतापर्यंत या संशयीतांना अटक
सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे नगरसेवक तथा भाजपाचे तत्कालीन गटनेते मुन्ना तेली यांचे पूत्र आसीफ मुन्ना तेली (रा.भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन (रा.धुळे), अंबादास आबाजी मानकापे (रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या 12 जणांना गुरुवारी एकाच वेळी अटक करण्यात आली आहे. यासाठी 15 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.

फसवणूक प्रकरणी ठोस पुरावे
पुण्यातील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 25 नोव्हेंबर 2020 रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ठोस पुरावे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर गुरुवारी संशयीतांची सहा पथकांमार्फत धरपकड राबवण्यात आली.


