लोणावळ्यात डॉक्टरांकडे दरोडा ; 50 लाखांची रोकड आणि 16 लाखांच्या दागिन्यांची लूट
लोणावळा : प्रधानपार्क परीसरातील एका डॉक्टरांकडे दरोडा टाकण्यात आल्यानंतर दरोडेखोरांनी 50 लाखांच्या रोकडसह 16 लाखांच्या दागिण्यांची लूट करण्यात आल्याने खळबळ उडाली. सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले आहेत. लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये ५० लाख रुपये रोख व १६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे दागिने असा साधारण ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवला आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांचा धाक दाखवत दरोडेखोर दाखल झाले व त्यांनी दाम्पत्याचे हात-पाय बांधल्यानंतर कपाटाच्या चाव्यांची विचारणा करीत कपाटातून 50 लाखांच्या रोकडसह 16 लाखांचे दागिने लांबवले. पोलिसात तक्रार दिल्यास पुन्हा पुढच्या महिन्यात दरोडा टाकू, असा दमही दरोडेखोरांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.


