50 लाखांच्या कर्जाचे नियमबाह्य समायोजन : भुसावळातील माजी नगरसेवक पूत्राच्या अटकेने खळबळ
बीएचआर घोटाळा : पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची भुसावळात कारवाई : 50 लाखांच्या कर्जाची यापूर्वीच फेड : माजी नगरसेवक मुन्ना तेली
भुसावळ : बीएचआर पतसंस्थेतील घोटाळा व कर्ज मॅचिंग प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जिल्ह्यासह राज्यात एकाचवेळी 15 पथकांनी छापेमारी करीत 12 दिग्गज्जांना ताब्यात घेतले. त्यात भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक व गटनेता मुन्ना इब्राहीम तेली यांचा मुलगा आसीफ तेली याचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या कारवाईनंतर भुसावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तेली यांनी 50 लाखांचे कर्ज घेतल्यानंतर त्याचे नियमबाह्यरीत्या समायोजन केल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तेली यांना निवासस्थानावरून ताब्यात घेतल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांची आधी चौकशी करण्यात आली व नंतर अँटीजन टेस्ट करून पथकाने त्यांना अटक करीत पुण्याला नेले. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
50 लाखांच्या कर्ज प्रकरणी कारवाई
पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेतील तीन जणांच्या पथकाने गुरूवारी सकाळी आसीफ तेली यांना राहत्या घरातून चौकशीकामी ताब्यात घेत बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले व तेथे काही तास स्वतंत्र खोलीत चौकशी केल्यानंतर अँटीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात आले. बीएचआरचे धागेदोरे भुसावळपर्यंत आल्यानंतर यापुढे कारवाई कुणावर ? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



50 लाखांच्या कर्जाची यापूर्वीच फेड : मुन्ना तेली
भाजपाचे तत्कालीन गटनेता तथा माजी नगरसेवक मुन्ना तेली म्हणाले की, बीएचआर पतसंस्थेतून आम्ही 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले मात्र यापूर्वीच त्याची आम्ही फेड केली आहे शिवाय दोन कोटींच्या मालमत्तेवर त्यासाठी बोजा बसवण्यात आला होता तो देखील उतरवण्यात आला आहे. चौकशीकामी मुलाला नेण्यात आले असून नेमकी कारवाई का झाली? हे सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले.
बीएचआर घोटाळ्यात 12 दिग्गजांना अटक
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी दुपारपर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात प्रसिद्ध दाळ व्यावसायीक प्रसिद्ध प्रेम कोगटा (जळगाव), भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसीफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) यांना अटक केली.

