देशभरातील 41 ऑर्डनन्स फॅक्टरींचे होणार निगमीकरण


कॅबीनेट मंत्री मंडळाकडून मंजुरी : निर्णयाचा निषेध ; कर्मचारी संघटना अनिश्‍चित काळासाठी संपावर उतरणार

भुसावळ : देशभरातील 41 आयुध कारखान्यांचे (ऑर्डन्स फॅक्टरी) निगमीकरण करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबीनेट मंत्री मंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्व कामगार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निर्णयाविरोधात अनिश्‍चित काळासाठी संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. आयुध निर्माणीचे निगमीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी सर्व कर्मचार्‍यांनी भुसावळ ऑर्डनन्सच्या मुख्य गेटवर जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा विरोध दर्शविला.

41 ऑर्डनन्सचे निगमीकरण
दोनशे वर्षे जुन्या आयुध कारखान्यांचा व संरक्षणाचा चौथा स्तंभ गणल्या जाणार्‍या 41 आयुध निर्माणीचे (डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग) च्या आधारावर सात विभिन्न विभागात वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात कर्मचारी संघटना अनिश्चित काळासाठी संपावर जातील, अशी माहिती ऑल इंडिया डीफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने उपाध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र झा यांनी दिली. या संपात बीपीएमएस व आयएनडीडब्ल्यूएफ फेडरेशन यांचाही सहभाग राहणार असल्याचे ते म्हणाले.





सरकारतर्फे एकतर्फी कारवाई
11 ऑक्टोंबर 2020 पासून सुरू होणार्‍या संरक्षण कर्मचार्‍यांच्या अनिश्चित कालीन संपापूर्वी मुख्य श्रम आयुक्त नेगी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 ऑक्टोंबर 2020 रोजी तिन्ही फेडरेशन व सरकार व आयुध निर्माणी बोर्ड यांच्यात बैठक झाली होती व त्यावेळी 11 ऑक्टोबर 2020 पासून सुरु होणारा अनिश्चित कालीन संप पुढे ढकलण्यात आला होता परंतु सरकारतर्फे आता एकतर्फी कारवाई निगममीकरण करण्याच्या संदर्भात घेण्यात आली आहे. सरकारने औद्योगिक विवाद 1948 च्या 33 (1) चे उल्लंघण करीत एकतर्फी निर्णय घेत आयुध निर्माणीचे निगमीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे झा म्हणाले.

भुसावळात कर्मचार्‍यांचा आक्रोश
सरकारच्या आयुध निर्माणीचे निगमीकरण करण्याच्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी सर्व कर्मचारी मुख्य गेटवर एकवटले व प्रचंड घोषणाबाजी करून सरकारचा विरोध दर्शवण्यात आला. आयुध कारखान्यांच्या निगमीकरण निर्णयाचा मुख्य गेटवर निषेध व्यक्त करण्यात आला व आयुध निर्माणीसाठी हा काळा दिवस असल्याचे संयोजक दिनेश राजगिरे म्हणाले. दरम्यान, शनिवार, 19 जून रोजी निर्माणीच्या मुख्य द्वारावर सरकारच्या निगमीकरण नीतीचा पुतळा दहन करण्यात येईल तसेच रविवार, 20 जून 2021 रोजी संरक्षणाच्या तिन्ही फेडरेशन एकत्रीत बैठक घेवून संपाबाबत रणनीती ठरवतील, असे दिनेश राजगिरे यांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !