भाड्याचा तगादा लावणार्‍या घर मालकाचा खून : आरोपी तरुणाला अटक


धुळे : घर मालक सातत्याने भाड्यासाठी तगादा लावत असल्याने तसेच वडिल सिगारेट पित असल्याने त्याबाबत टोमणे मारत असल्याने संतप्त भाडेकरू असलेल्या तरुणाने घर मालकाचा लोखंडी पावडीने वार करून खून केल्याची घटना चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत रमेश हिलाल श्रीराव (60, प्लॉट नं.4, आशीर्वाद बंगला, राजहंस कॉलनी, धुळे) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयीत आरोपी अजिंक्य मेमाणे (22) यास धुळे शहर पोलिसांनी अटक केली.

टोमणे असह्य झाल्याने घर मालकाचा खून : पत्नी बचावली
स्टेट बँकेच्या कुसुंबा शाखेतून एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झालेले रमेश हिलाल श्रीराव (60, प्लॉट नं.4, आशीर्वाद बंगला, राजहंस कॉलनी, धुळे) हे कुटुंबासह धुळ्यात वास्तव्याला होते. त्यांच्या बंगल्यात सुमारे सहा महिन्यांपासून जुन्नरमधील मुकबधीर शाळेतील शिक्षक विश्वनाथ मेमाणे हे परीवारासह वास्तव्यास आहेत. मेमाणे यांना दोन मुले असून एक मुलगा अजिंक्य मेमाणे (22) हा कोपरगाव येथे बीसीएचे शिक्षण घेतो मात्र लॉकडाऊनमुळे धुळ्यात परतला आहे. शिक्षक विश्‍वनाथ मेमाणे हे सिगारेट पितात, घर भाडे देत नाही, असे श्रीराव हे अजिंक्यला वारंवार टोकत असल्याने अजिंक्य या प्रकाराला वैतागला होता. मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अजिंक्यने संतापाच्या भरात योगा करीत असलेल्या रमेश श्रीराव यांच्यावर लोखंडी पावडीने जोरदार प्रहार केल्याने ते गंभीर जखमी होवून बेशुद्ध झाले व उपचारार्थ हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर याचवेळी श्रीराव यांच्या पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र त्यांनी सुटका करीत मदतीसाठी आरडा-ओरड केल्याने नागरीक जमल्याने अनर्थ टळला.

आरोपी तरुणाला अटक
वृद्धाचा खुन झाल्याची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहा.निरीक्षक तिगोटे, दादासाहेब पाटील व सहकार्‍यांनी पथकासह धाव घेतली. आरोपी अजिंक्य मेमाने यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !