पेट्रोल पंप चालकास लूटले : चौघे दरोडेखोर जाळ्यात
शिरपूर : पेट्रोल पंपाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दिड लाखांची रोकड लुटणार्या चार दरोडेखोरांना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून लुटीतील एक लाख 56 हजार रुपयांची रोकड व दुचाकी जप्त करण्यात आली. राहुल मिरचंद पावरा (बडीयापाणी), रोशन आसाराम पावरा, अजय सुरेश निंगवाले, राहुल पावरा (खुंटवाडी मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मिरची पूड टाकून केली लूट
शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी संजय शर्मा यांच्या खंबाळे शिवारात पेट्रोल पंप आहे. गुरुवार, 1 जुलै रोजी रात्री सव्वा आठ वाजता शर्मा हे इंधन विक्रीची रोकड एका बॅगेत भरून सांगवी गावाकडे दुचाकीने येत असताना खंबाळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर दुचाकीवरून आलेले पाच अज्ञात दरोडेखोरांनी संजय शर्मा यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकून मोटर सायकलच्या हँडलला लावलेली पैशांची बॅग लांबवत पळ काढला होता. या प्रकरणी संजय शर्मा यांनी शिरपूर तालुका पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी तत्काळ एक पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवत चौघा आरोपींना अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करीत आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दीपक वारे, लक्ष्मण गवळी, चत्त्तरसिंग खसावत, योगेश दाभाडे ,योगेश मोरे, संजय देवरे, गोविंद कोळी, महेंद्र वानखेडे, योगेश गीते, इसरार फारूकु, सईद शेख आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.

