अवैध दारूचा मिनी कारखाना नष्ट : चौघे आरोपी जाळ्यात
हिवरखेडा येथे शिरपूर पोलिसांची कारवाई : 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर : तालुक्यातील हिवरखेडा येथे शिरपूर तालुका पोलिसांनी अवैधरीत्या सुरू असलेल्या बनावट दारुचा मिनी कारखाना उद्ध्वस्त केला. चौघा संशयीतांना अटक करण्यात आली असून 19 लाख 26 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रविवारी रात्री तालुक्यातील हिवरखेडा गावाच्या शिवारात शेतातील एका घरावर छापा टाकून बनावट दारुचा कारखाना नष्ट करण्यात आला. दारू बनवण्यासाठी लागणारे
दोन हजार लिटर शुद्ध स्पिरीट, प्लॉस्टिकच्या रीकाम्या बाटल्या, दारुच्या बाटल्याचे बनावट बुच, विदेशी कंपनीचे बनावट लेबल, होलोग्राम, पॅकिंग मशीन व इलेक्ट्रिक मोटार आदी साहित्य जप्त करण्यात आले. अवैध बनावट दारू निर्मिती कारखान्यातील राजेश गिलदार बर्डे (23, रा. जोगवाडा, ता. नेवाली, जि.बडवाणी, म.प्र.), धमेंद्र कैलासचंद पुरभिया (वय 23, रा. दुढलाय, ता. जुलालपूर, जि. शाजापूर, म.प्र.), देवेंद्र मोतीलाल मालवी (वय 19, रा. बेरागढ खुमान, ता. शामपूर, जि. सिहोर, म.प्र.) आणि योगेश बाबुलाल मालवी (वय 22, रा. जिकडाखेडा, ता. बागली, जि. देवास, म.प्र.) यांना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पीएसआय नरेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र वानखेडे, नियाज शेख, हेमंत पाटील, राजेंद्र मांडगे, धनगर, संजीव जाधव, पवन गवळी, कुंदन पवार, पोका. इसरार फारुकी, सुनीता पवार, अश्विनी चौधरी यांच्या पथकाने केली. तपास सहा.पोलीस सुरेश शिरसाठ करीत आहेत.

