बंद घरातून चोरट्यांनी चार लाखांचा मुद्देमाल लांबवला
शिरपूर : दुपारी नमाज पठणासाठी सहकुटुंब मशिदीत गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी खर्दे-शिरपूर रस्त्यालगत दत्त मंदिरासमोरील कॉम्प्लेक्समधील फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून कपाटातील चार लाख रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली.
बंद घराला केले टार्गेट
खर्दे-शिरपूर रस्त्यालगत दत्त मंदिरासमोरील शिवशक्ती कॉम्प्लेक्समध्ये राहणारे आरिफ बोहरी यांच्या बंद घरात मंगळवारी दुपारी चोरट्यांनी चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले. आरीफ यांनी मुलीच्या विवाहाच्या खर्चासाठी रक्कम जमवली होती. मंगळवारी दुपारी नमाजसाठी ते कुटुंबासह मशिदीत गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून कपाटातील चार लाख रुपये चोरून नेले.घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेत पाहणी केली तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथक श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.


