जिल्हा बँकेविषयी शेतकर्यांची नाराजी : कामे झालीच नाही ; माजी खासदार डॉ.उल्हास पाटील
जळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील यांनी जिल्हा बँक अध्यक्षांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी टिकेची तोफ डागत थेट माजी मंत्री खडसेंवर निशाणा साधला आहे. डॉ.पाटील म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्तारूढ असलेल्यांमध्ये शेतकर्यांची प्रचंड नाराजी असून सत्ताकाळात शेतकरी हिताची जी कामे व्हायला हवी होती ती झालेली नाहीत, असे ते म्हणाले. जिल्हा बँक अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरच हा निशाणा साधण्यात आला. दरम्यान, शेतकर्यांच्या नाराजीची उणीव भरून काढण्यासाठीच काँग्रेसने स्वतंत्र पॅनल देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. आता खडसे यावर काय उत्तर देतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




