भांग मिश्रीत गोळ्यांची तस्करी रोखली : पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकास अटक
बोलेरो वाहन जप्त : शिरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई
शिरपूर : मध्यप्रदेश राज्यातून नशेच्या गोळ्यांची तस्करी करणार्या एक बोलेरो वाहनावर शिरपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पनाखेड गावाजवळ धडक कारवाई करीत पाच लाख सात हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी उशिरा तालुक्यातील पनाखेड गावाजवळ एक गोपनीय माहितीवरून तालुका पोलिसांनी केली. मंगळवार, 14 सप्टेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पनाखेड गावाजवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सापळा रचून (एम.पी.46 जी.2349) क्रमांकाच्या बोलेरो वाहनाची तपासणी केली असता वाहनात सात हजार 920 रुपये किंमतीच्या मस्ताना मणुका स्पेशल नावाच्या भांग मिश्रीत नशायुक्त गोळ्या आढळल्या. शिरपूर तालुका पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची बोलेरो ताब्यात घेत एकूण 5 लाख 7 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बोलेरो चालक नानीराम धरमसिंग ऊर्फ मुन्ना भुगवाडे (35, बेडीफल्या घेरु, घाटी, ता.वरला, जि.बडवाणी मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी.टी.बाविस्कर, हवालदार मोरे, हवालदार जाधव, सिध्दांत मोरे, चालक हवालदार सईद शेख यांनी केली.

