भुसावळ बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांची शनिवारी सायंकाळी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याचे सांगत बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नशिराबाद खून प्रकरणात निरीक्षकांची बदली
मंगळवार, 21 रोजी भुसावळ येथील तरुणाचा नशिराबाद उड्डाणपुलाखाली निर्घृणपणे खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील मारेकरी व मयत असल्याने स्थानिक स्तरावर पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना न झाल्याचा ठपका ठेवून ही बदली झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष महानिरीक्षकांनीही व्यक्त केली नाराजी
कारागृहातून सुटलेल्या भुसावळातील तरुणाची नशिराबाद येथे झालेल्या निर्घृण हत्या व त्यानंतर लागलीच जळगावातील कांचन नगरात पहाटेच्या सुमारास संशयीतानी तरुणावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जे.शेखर यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करणार असल्याचे त्यांनी सांगत अवैधरीत्या शस्त्र बाळगणार्यांसह अवैध सावकारी प्रकरणी धडक कारवाई होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले होते.
शिस्तप्रिय अधिकार्याच्या बदलीने खळबळ
दरम्यान, निरीक्षक दिलीप भागवत यांची अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असून बाजारपेठ हद्दीतील अनेक गुन्ह्यांचा त्यांच्या काळात उलगडा झाला होता शिवाय जनता व पोलीस यांच्यात त्यांनी नेहमीच सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. निरीक्षक भागवत यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे भुसावळकरांसह पोलीस दलातील कर्मचार्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
पोलीस अधीक्षक म्हणाले ; अशा पद्धत्तीने कारवाई होणार
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, प्रशासकीय कारणास्तवर निरीक्षक दिलीप भागवत यांना कंट्रोल अॅटेच करण्यात आले असून भुसावळ शहर निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. नशिराबाद खून प्रकरणात प्रिव्हेन्शन झाले नसल्याचे त्यांनी सांगत यापुढे देखील अशाच पद्धत्तीने कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.



