दुय्यम निबंधक कार्यालयातील डाटाएंट्री ऑपरेटरसह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
Data entry operator from the Sub-Registrar’s office and a private tout caught in ACB net नांदगाव (13 जून 2026) : नांदगावातील दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदीखत दस्ताच्या प्रमाणित प्रती देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच स्वीकारणार्या डाटा एन्ट्री ऑपरेटरसह खाजगी पंटराला एसीबीने पथकाने रंगेहात पकडल्याने लाचखोर हादरले आहेत. डाटा एन्ट्री ऑपरेटर धारासिंग बाबूलाल राठोड (53, नांदगाव) व खाजगी पंटर सागर राजेंद्र बोरसे (33, रा.लासलगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेतजमीन ही तक्रारदाराचे चुलत आजोबा व इतर अशांनी परस्पर विक्री केल्याने पुढील कायदेशीर लढाई लढण्यासाठी ते खरेदीखत दस्तांच्या प्रमाणित प्रती मिळविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय, नांदगाव येथे अर्ज केला होता. संबंधित कामासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 1,200 रुपयांची लाच मागितली. पडताळणीदरम्यान तडजोडीअंती 1,000 रुपये लाच स्वीकारण्याचे ठरले.
त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व दोन्ही आरोपींना एक हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पेलकर, हवालदार दिनेश खैरनार, हवालदार अविनाश पवार, चालक समीर शेख आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करीत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.



