भुसावळात राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा रोखला
भुसावळकरांची खड्डेमय रस्त्यातून सुटका करण्याची मागणी ; कृषी कायद्यांचा निषेध : प्रशासनाला निवेदन
भुसावळ : केंद्र सरकारने शेतकरी हिताविरोधात पारीत केलेले काळे कायदे रद्द करावेत, इंधन दरवाढ नियंत्रणात आणावी, महागाई नियंत्रणात आणावी यासह अन्य मागण्यांसाठी भारत बंदची सोमवारी हाक देण्यात आली होती मात्र कोरोना पार्श्वभूमीवर मुळातच व्यापारी संकटात असल्याने बंदला काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवत भुसावळ तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच काळे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, भुसावळात राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवत भुसावळातील खड्डेमय रस्त्यातून शहरवासीयांची सुटका करण्याची मागणी यावेळी केली.
भुसावळ तहसीलदारांना निवेदन
राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक उल्हास पगारे, गटनेता दुर्गेश ठाकूर, सचिन पाटील, मुन्ना सोनवणे, शहर युवा अध्यक्ष रणजीत चावरीया, राजू भोई, विशाल ठोके, सिध्दार्थ पगारे, तुषार चौधरी, भुषण भंगाळे, अविनाथ तायडे, गणेश आहिरे, प्रमोद पवार, रीतेश सोनवणे आदी उपस्थित होते.







पालकमंत्री महोदय : भुसावळकरांची यातनातून मुक्तता करा
राष्ट्रवादी पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गांधी पुतळ्याजवळून जात असताना शहरातून यावलकडे जाणार्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा पदाधिकार्यांनी थांबवला. यावेळी शहराध्यक्ष नितीन धांडे व नगरसेवक उल्हास पगारे यांनी पालकमंत्र्यांना शहरातील एकही रस्ता चालण्यायोग्य राहिला नसल्याने खड्डेमय रस्त्यातून भुसावळकरांची मुक्तता करावी, असे साकडे घातले. यावेळी पालकमंत्री यांनी याबाबत आपण निधी देखील दिला आहे. यापूर्वीही मुख्याधिकार्यांसोबत बोलून रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे सांगितले आहे. हा प्रश्न निवडणूकीपूर्वीच सोडवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
ही बातमी वाचली का- विवरे खुर्द शेतशिवारात वीज कोसळली : 25 वर्षीय शेतमजूर विवाहितेचा मृत्यू


