नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील केमिस्ट्रीच्या प्राध्यापकाला अटक
सीबीआयच्या मते संशयीत मास्टरमाईंड ; आतापर्यंत आठ आरोपींना अटक
Chemistry Professor from Pune Arrested in NEET Paper Leak Case नवी दिल्ली (15 मे 2026) : नीट पेपर लीक प्रकरणात शुक्रवारी आठव्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पी.व्ही. कुलकर्णी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले कुलकर्णी हे मास्टरमाईंड असल्याचा सीबीआयला संशय आहे.
सीबीआय कुलकर्णी यांनाच लीक प्रकरणाचा सूत्रधार (मास्टरमाइंड) सांगत आहे. तपास यंत्रणेनुसार, कुलकर्णी लातूरचे रहिवासी आहेत. ते रसायनशास्त्राचे डोमेन एक्सपर्ट आहेत. अनेक वर्षांपासून ते नीट पेपर तयार करणार्या पॅनेलचा भागही होते.






कुलकर्णी यांना पेपरपर्यंत थेट पोहोच होती. ते पुण्यात त्यांच्या घरी कोचिंग क्लास चालवत होते. जिथे ते नीट पेपरमध्ये येणार्या प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना आधीच सांगत होते. 3 मे च्या पेपरपूर्वी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीने अनेक विद्यार्थ्यांना लीक झालेला पेपर दिला.
दरम्यान, पेपरफुटीमुळे दुःखी झालेल्या दिल्लीतील 20 वर्षीय तरुणीने, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील 21 वर्षीय तरुणाने आणि गोव्यातील 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
टेलीग्राम ग्रुपवर लीक झालेला पेपर शेअर झाला होता
सीबीआयच्या तपासात हे देखील समोर आले आहे की, नीट 2026 चा पेपर 1 मे रोजीच लीक झाला होता. तो ‘प्रायव्हेट माफिया’ नावाच्या टेलीग्राम ग्रुपवर टाकला गेला होता. याचा एक व्हिडिओ देखील समोर आल्याची चर्चा आहे.


