भुसावळ नगरपालिकेचा कारभार रीक्त पदांमुळे ‘रामभरोसे’
भुसावळ : पालिकेत गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त पदांची संख्या वाढली आहे. बदलीनंतर रिक्त पदांवर नवीन कर्मचारी नियुक्ती केले जात नाही. त्यामुळेच टाऊन प्लॅनिंग, बांधकाम, विद्युत, अग्निशमन आणि कर वसुली विभाग वार्यावर आहे. बांधकाम विभागात तब्बल सात अभियंत्यांची पदे आहेत. त्यापैकी सहा रिक्त असून केवळ एकाच अभियंत्यावर कामकाज सुरू आहे. नाशिक विभागातील सर्वांत मोठी अ वर्ग नगरपालिका असा भुसावळचा लौकिक आहे. मात्र, रीक्त पदांमुळे या पालिकेचा कारभार रामभरोसे आहे. बदली किंवा सेवानिवृत्तीनंतर रीक्त झालेल्या जागेवर अधिकार्यांची नियुक्ती होत नाही. यामुळे महत्वाच्या विभागांत अपूर्ण मनुष्यबळ आहे. पालिकेत टाऊन प्लॅनरची चार पदे आहेत. यापैकी केवळ दोन पदांवर कर्मचारी होते. त्यांचीही बदली झाल्याने आता पालिकेकडे टाऊन प्लॅनर नाही. अतिशय महत्वाच्या बांधकाम विभागात 7 पैकी केवळ एकच अभियंता कार्यरत आहे.
कर वसुली विभागात कर्मचारी नाहीत
पालिकेच्या उत्पन्नासाठी महत्त्वाच्या करवसुली विभागात कर्मचारी नाहीत. शहरासाठी एकच वीज अभियंता असे पद असून तेथील अभियंत्यांची बदली झाली आहे. यामुळे दिवाबत्तीचा प्रश्न जटील बनला आहे. अग्निशमन विभागात फायरमनची पाच पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने या जागांवर इतर अकुशल कर्मचारी नेमून काम भागवले जाते. मात्र, ही कसरत करताना उपलब्ध मनुष्यबळाचे हाल होतात. त्यांना अतिरिक्त काम करावे लागते.






निवडणूक तोंडावर, कामांवर होतोय परिणाम
पालिकेतील उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे यांची दोन दिवसांपूर्वी बदली झाली. त्यांच्यासह यापूर्वी बदली झालेल्या कर्मचार्यांच्या जागी नवीन मनुष्यबळाची नियुक्ती झालेली नाही. याबाबत मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना विचारले असता वरिष्ठ पातळीवरुन पाठपुरावा सुरू आहे. टाऊन प्लॅनिंग, इलेक्ट्रिकल, सामान्य प्रशासन, बांधकाम व अनेक विभागात मनुष्यबळ कमी असल्याने कामांवर निश्चित परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मनुष्यबळाअभावी पालिकेतील कामकाजावर परिणाम झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवक देखील त्रासले आहेत. निवडणूक तोंडावर असल्याने वॉर्डातील कामे किंवा तक्रारी घेऊन येणार्यांना उत्तरे देताना त्यांच्याही नाकी नऊ येत असल्याचे चित्र आहे.


