विधानसभा निवडणूक केव्हाही होवू द्या : भाजपाच बहुमत मिळवणार : चंद्रकांत पाटील
मुंबई : विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व 288 जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भाजप सज्ज आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरात केला. विदर्भ मराठवाड्यातील प्रचंड पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसले तरी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा दौरा सुरू झाला आहे. राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व 48 जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार संघटना काम करत असल्याचं पाटील म्हणाले.
सरकार कार्यकाळ पूर्ण करेल की नाही ही शंकाच !
चंद्रकांत पाटील म्हणाले की. महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते. मतभेदानंतरही महाविकास आघाडीचे घटक पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले आणि भाजपाच्या विरोधात एकत्र लढले तरी निवडणुकीत त्यांचा सामना करण्याची तयारी भाजपाने केली आहे.








