समाजाचे आपण देणं लागतो या हेतूने अखंडित सेवावृत्ती रहा
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : स्व.स्वप्नील स्मृति गोकुलग्राम गोअनुसंधान केंद्राचे भूमिपूजन : घरट्यातून आकाशाकडे पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
भुसावळ : प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख असतेच त्यामुळे दुःख वाट्याला आल्यानंतर हताश व व्यथित न होता आध्यात्मिक व सामाजिक मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवावी. समाजाप्रती आत्मभान जागृत ठेवून समाजाचे आपण देणे लागतो या हेतूने अखंडित सेवावृत्ती राहावे. देव बनण्यापेक्षा देवाचा मित्र बनून राहिल्यास देव आपली सदैव काळजी घेत असतो, असे प्रतिपादन महामंडलेश्वर आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. भुसावळ तालुक्यातील कुर्हेपानाचे लगत स्वर्गीय स्वप्निल स्मृती गोकुलग्राम गोअनुसंधान केंद्राचे भूमिपूजन व ‘घरट्यातून आकाशाकडेि पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक पी.पी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य श्याम चैतन्यजी महाराज, भुसावळ श्री श्रावक संघाचे संघपती सुगनचंद सुराणा, ज्ञान प्रकाश योजना जैन कॉन्फरन्स दिल्लीचे प्रेमचंद कोटेचा, पहूरचे माजी सरपंच समाजसेवक प्रफुल्ल लोढा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा वंदना चौधरी, गौसेवाव्रती अँड. विजय काबरा, कुर्हा पानाचे सरपंच जीवन प्रल्हाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.दीपाली सोनार व डॉ.जीवन कटारीया यांनी तर आभार विनोद भोईटे यांनी मानले. प्रारंभी स्व.स्वप्नील स्मृती गोकुलग्राम गो अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व श्याम चैतन्यजी महाराज व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले. पौराहित्य विनायक शास्त्री जोशी महाराज यांनी केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात प्रा. डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांच्या मातोश्री ताराबाई मदनलाल ललवाणी व चिरंजीव स्व.स्वप्निल दिलीपकुमार ललवाणी यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना गाय-वासरूची मूर्ती मदनलाल ललवाणी यांच्याहस्ते भेट देण्यात आली. उर्वरित मान्यवरांचा यथोचित सत्कार नलीन ललवाणी, सुयश ललवाणी, प्रा.डी.एम.ललवाणी, आदेश ललवाणी, पारस ललवाणी, वर्षा ललवाणी, रुपसिंग परदेशी यांच्याहस्ते करण्यात आला. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आपल्या मनोगतात म्हणाले की,



ललवाणी परीवाराचा निर्णय कौतुकास्पद : महामंडलेश्वर
ललवाणी परिवाराने घेतलेला गोकुलग्राम गो अनुसंधान केद्राचा निर्णय कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. गाईचे महत्व अगणित आहे. गाय विषयावर विशेष व्याख्यान सुद्धा देता येईल. आपल्या मानवी जीवनात अत्यंत पूरक व लाभदायी गाय असल्याने गाईचे महत्त्व जाणून घेऊन गोशाळा तयार करण्याचा ललवाणी परिवाराचा निर्णय उत्तम आहे. त्यांच्या मातोश्री व त्यांचे चिरंजीव यांच्या जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर त्यांनी समाजाप्रती आस्था ठेवून धरलेली वाटचाल प्रेरणादायी आहे, असेही महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले. शाम चैतन्य महाराज यांनी आपल्या मनोगतात ललवाणी परीवाराचे कौतुक करून सत्संग, अध्यात्म व सामाजिकता जोपासून आपले मानसिक समाधान उत्तमरीत्या घडून येत असल्याचे सांगितले. प्रेमचंद कोटेचा यांनी गोशाळेत भाकड गायी आणाव्या आणि त्या माध्यमातून गायींची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून अनेक शेरो-शायरी सादर करीत ललवाणी परीवाराच्या कार्याचे कौतुक केले. वंदना चौधरी यांनी ललवाणी परीवाराच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कळमसरे गावाप्रती असलेली ललवाणी परीवाराची आस्था नमुद केली. सरपंच जीवन पाटील यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा.डॉ.दिलीपकुमार ललवाणी लिखित ‘घरट्यातून आकाशाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात 32 विद्यार्थिनींबाबतची माहिती प्रा.ललवाणी यांनी लिहिली आहे. यापैकी अनेक विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करुन ललवाणी सरांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी अनेकांच्या कडा पाणावल्या. सर्व उपस्थितांना गायीची मूर्ती व पुस्तक भेट देण्यात आले. वर्षा ललवाणी यांच्या मधुर आवाजातील नवकार मंत्राच्या धुनने कार्यक्रमाची सुरवात तर विद्यार्थिनींच्या समुह पसायदान गायनाने सांगता झाली. यावेळी ललवाणी पाीवारासह समाजातील बांधव तसेच हितचिंतक, मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

